citynewsLatest NewsMaharashtraWardha

रासा घोंसा गावात मध्यरात्री अस्वलाचा वावर; ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

घराच्या व्हरांड्यात अस्वल व पिल्लू; वनविभागाकडे संरक्षणात्मक उपाययोजनांची ग्रामस्थांची मागणी

वर्धा | प्रतिनिधी

वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील रासा घोंसा गावात मध्यरात्री एका घराच्या व्हरांड्यात अस्वल आणि त्याचे पिल्लू आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पहाटे घराबाहेर आलेल्या नागरिकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, रासा घोंसा गावातील संदीप पडवे हे पहाटे लघुशंकेसाठी घराबाहेर आले असता मोबाईलच्या प्रकाशात त्यांना घराच्या व्हरांड्यात अस्वल आणि त्याचे पिल्लू बसलेले दिसले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी कोणतीही घाई न करता तात्काळ गावकऱ्यांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. सुरक्षित अंतर राखून त्यांनी अस्वल आणि त्याच्या पिल्लावर लक्ष ठेवले. सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांनी प्रयत्न करून दोन्ही वन्यप्राण्यांना जंगलाच्या दिशेने परतवून लावले. या संपूर्ण घटनेत कोणालाही इजा झाली नसल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.

दरम्यान, गावात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे अशा घटना अधिक धोकादायक ठरत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी गावात सुरळीत वीजपुरवठा करावा तसेच गावालगतच्या भागात संरक्षणात्मक जाळी उभारण्याची मागणी त्यांनी वनविभागाकडे केली आहे.

वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीकडे वाढता वावर ही चिंतेची बाब ठरत असून, अशा घटना टाळण्यासाठी वनविभागाने प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button