citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraMaharashtraCrimeYavatmal

यवतमाळ पोलिसांची मोठी कारवाई; ८८५ किलोहून अधिक गांजा नष्ट

२९ गुन्ह्यांतील जप्त अमली पदार्थांचा विल्हेवाट; बाजारमूल्य सुमारे १.७५ कोटी रुपये

यवतमाळ | प्रतिनिधी

यवतमाळ पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील विशेष मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला ८८५.१५९ किलोग्रॅम गांजा नष्ट केला. या अमली पदार्थाची अंदाजे बाजारातील किंमत सुमारे १ कोटी ७५ लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या २९ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या गांज्याची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीनंतर २ जुलै २०२६ रोजी नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड येथे ड्रग डिस्पोजल कमिटीच्या उपस्थितीत पंचनामा करून जप्त गांज्याचा नाश करण्यात आला.

दरवर्षी २६ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक अमली पदार्थविरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर युवकांमध्ये अमली पदार्थांविषयी जनजागृती करणे आणि व्यसनमुक्त समाज निर्माण करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

ही कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या अध्यक्षतेखालील ड्रग डिस्पोजल कमिटीच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, पोलीस उपअधीक्षक सुनील हुड, पोलीस निरीक्षक सतीश चव्हरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मनीष गावंडे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी यवतमाळ पोलीस सातत्याने विशेष मोहिमा राबवत असून, युवकांनी अमली पदार्थांपासून दूर राहावे आणि अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button