citynewsLatest NewsMaharashtraNanded

वारंवार वीज खंडित; संतप्त ग्राहकाने अधिकाऱ्यांच्या खुर्चीला बांधले निवेदन

अर्धापूर तालुक्यातील चार गावांतील नागरिकांचा अनोखा निषेध; वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

नांदेड | प्रतिनिधी

अर्धापूर तालुक्यातील मेढला खुर्द, मेढला बुद्रुक, खडकी आणि सांगवी या गावांमध्ये वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या समस्येबाबत वारंवार तक्रारी करूनही समाधानकारक तोडगा न निघाल्याने संतप्त वीज ग्राहकाने महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीला निवेदन बांधून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. या आंदोलनामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक दिवसांपासून या चारही गावांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी सतत वीज जात असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे निर्माण होत असून नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

वीजपुरवठा खंडित राहिल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

या समस्येचा कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या मागणीसाठी नागरिक अर्धापूर येथील महावितरण कार्यालयात गेले. मात्र संबंधित अधिकारी कार्यालयात अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर एका संतप्त ग्राहकाने अधिकाऱ्यांच्या खुर्चीला निवेदन बांधून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

यावेळी नागरिकांनी वीजपुरवठा तातडीने सुरळीत न केल्यास लेकराबाळांसह महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. तसेच वारंवार होणाऱ्या वीज खंडितीची कारणे शोधून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली.

वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचा संयम सुटू लागला असून या समस्येवर महावितरण प्रशासन काय भूमिका घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button