गुन्हेगार नाही, भविष्य वाचवायचंय! आर्वी पोलिसांचा संवेदनशील पुढाकार

गांजा सेवन करणाऱ्या २२ वर्षीय तरुणावर कायदेशीर कारवाई; न्यायालयाच्या परवानगीने व्यसनमुक्ती केंद्रात उपचारासाठी पाठवले
वर्धा | प्रतिनिधी
कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडतानाच तरुणांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आर्वी पोलिसांनी संवेदनशील पुढाकार घेतला आहे. गांजा सेवन करताना आढळलेल्या २२ वर्षीय तरुणावर एनडीपीएस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. मात्र, त्याचे वय आणि परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी त्याला केवळ आरोपी म्हणून न पाहता व्यसनमुक्तीचा मार्ग दाखवण्याचा निर्णय घेतला.
गांजा सेवन करताना तरुण आढळला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ऑगस्ट रोजी आर्वीच्या डीबी पथकाला राजू नरेश भोयर हा २२ वर्षीय तरुण गांजा सेवन करताना आढळून आला.
यानंतर त्याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली. चौकशीदरम्यान मागील तीन महिन्यांपासून गांजाचे सेवन करत असल्याचे तरुणाने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.
चुकीच्या संगतीमुळे व्यसन लागल्याचे समोर
चौकशीत चुकीच्या संगतीमुळे गांजाचे व्यसन लागल्याचे तरुणाने सांगितले. तरुणाचे वय आणि त्याचे भवितव्य लक्षात घेऊन आर्वी पोलिसांनी या प्रकरणाकडे केवळ कायदेशीर कारवाईच्या दृष्टिकोनातून न पाहता त्याला व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला.
न्यायालयाच्या परवानगीने व्यसनमुक्ती केंद्रात रवाना
१७ ऑगस्ट रोजी तरुणाला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या परवानगीने त्याला वर्धा येथील व्यसनमुक्ती केंद्रात उपचार आणि समुपदेशनासाठी पाठविण्यात आले.
या माध्यमातून तरुणाला व्यसनातून बाहेर काढून त्याला पुन्हा सामान्य आणि सकारात्मक जीवनाकडे वळवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
पोलिसांच्या भूमिकेचे कौतुक
कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासोबतच व्यसनाच्या आहारी जाणाऱ्या तरुणांचे आयुष्य वाचवण्याची भूमिका आर्वी पोलिसांनी घेतली आहे.
‘गुन्हेगार म्हणून शिक्षा करण्यासोबतच तरुणाचे भविष्य वाचवणेही महत्त्वाचे’, असा संवेदनशील संदेश या कारवाईतून समोर आला आहे. आर्वी पोलिसांच्या या पुढाकाराचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.



