citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur graminNagpurPoliceramtek

रामटेकमध्ये ट्रॅक्टर उलटून चालकाचा दुर्दैवी मृत्यू

शेतातील काम आटोपून घरी परतताना दुर्घटना; चाचेर येथील घटनेने परिसरात हळहळ

रामटेक | प्रतिनिधी

रामटेक तालुक्यातील चाचेर येथे ट्रॅक्टरचा दुर्दैवी अपघात होऊन चालकाचा मृत्यू झाला आहे. शेतातील काम आटोपून घरी परतत असताना ट्रॅक्टर सांडनाल्यात उलटल्याने ही घटना घडली. या दुर्घटनेत चालक ट्रॅक्टरखाली अडकला आणि पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

सांडनाल्याजवळ ट्रॅक्टरचा अपघात

ही घटना १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाचेर येथे घडली. मृतकाचे नाव विनोद लक्ष्मण सतीकोरसे, वय ४० वर्षे, असे आहे. ते नागठाणा, चाचेर, तालुका मौदा, जिल्हा नागपूर येथील रहिवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद सतीकोरसे हे ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतात चिखलाचे काम करून घरी परतत होते. सांडनाल्याजवळ पोहोचले असता ट्रॅक्टरच्या मागील बाजूस जोडलेली लोखंडी दाताळ सांडनाल्याच्या लोखंडी अँगलमध्ये अडकली.

ट्रॅक्टर थेट सांडनाल्यात उलटले

दाताळ अँगलमध्ये अडकल्याने ट्रॅक्टर जागेवरच फिरले आणि त्यानंतर सांडनाल्यात जाऊन उलटले. या दुर्घटनेत विनोद सतीकोरसे ट्रॅक्टरखाली अडकले आणि पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने विनोद यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांचा मृतदेह रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागारात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला.

पोलिसांकडून तपास सुरू

या प्रकरणी रामटेक पोलीस ठाण्यात मर्ग क्रमांक ४०/२०२६, कलम १९४ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अन्वये नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू असून, शवविच्छेदनानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभिप्राय मागविण्यात आला आहे.

शेतातील काम आटोपून घरी परतत असताना घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे विनोद सतीकोरसे यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

रामटेकमधून सिटी न्यूजसाठी अजय मेहरकुळे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button