गोपाल नगर हत्याकांड : राजापेठ पोलिसांकडून घटनास्थळी सीन रिक्रिएशन

हत्येचा घटनाक्रम पुन्हा उलगडला; पुरावे आणि आरोपींच्या जबाबांची पडताळणी सुरू
अमरावती | प्रतिनिधी
अमरावतीतील गाजलेल्या गोपाल नगर हत्याकांडाच्या तपासात राजापेठ पोलिसांनी आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना कडेकोट पोलीस बंदोबस्तात घटनास्थळी नेऊन सीन रिक्रिएशन करण्यात आले. तपास अधिक भक्कम करण्याच्या उद्देशाने हत्या नेमकी कशी घडली, वादाची सुरुवात कशी झाली आणि त्यानंतरचा घटनाक्रम काय होता, याची प्रत्यक्ष पुनर्रचना करण्यात आली.
राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपाल नगर येथील सूतगिरणी परिसरात ६५ वर्षीय माणिक बळीराम बोरकर यांच्या हत्येप्रकरणी पोलीस सखोल तपास करीत आहेत. तपासाचा भाग म्हणून आरोपींना घटनास्थळी आणून संपूर्ण घटनाक्रमाची पुनर्रचना करण्यात आली.
सीन रिक्रिएशनदरम्यान आरोपींकडून वाद नेमका कुठे झाला, हल्ला कशा प्रकारे करण्यात आला आणि त्यानंतर त्यांनी कोणत्या हालचाली केल्या, याची माहिती घेऊन पोलिसांनी घटनास्थळावरील परिस्थितीची प्रत्यक्ष पडताळणी केली. या प्रक्रियेदरम्यान घटनास्थळावरील पुरावे आणि आरोपींच्या जबाबांमध्ये सुसंगती आहे का, याचीही तपासणी करण्यात आली.
प्राथमिक तपासानुसार, सिगारेट मागण्याच्या किरकोळ कारणावरून झालेला वाद विकोपाला गेला आणि त्यातून धारदार शस्त्राने हल्ला करून माणिक बोरकर यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या काही तासांत तिन्ही आरोपींना अटक केली होती.
सीन रिक्रिएशनदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तपासातील प्रत्येक बाबीची बारकाईने नोंद घेत पुरावे अधिक मजबूत करण्यावर पोलिसांनी भर दिला.
गोपाल नगर हत्याकांडाच्या तपासात राजापेठ पोलिसांनी वेगाने प्रगती केली असून, सीन रिक्रिएशनमधून मिळालेल्या माहितीमुळे तपासाला आणखी बळ मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून न्यायालयीन प्रक्रियेसाठी आवश्यक पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे.



