अमरावतीत अतिक्रमणाविरोधात महापालिकेची धडक कारवाई

समर्थ हायस्कूल व गुलशन टॉवर परिसरातील अवैध केबिन, हातगाड्या हटवल्या; चार ट्रक साहित्य जप्त
अमरावती | प्रतिनिधी
अमरावती शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेने झोन क्रमांक २ अंतर्गत मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. या कारवाईत समर्थ हायस्कूल आणि गुलशन टॉवर परिसरातील अवैध दुकाने, लोखंडी केबिन, चहाच्या टपऱ्या आणि हातगाड्या जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आल्या. कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले.
महापालिकेच्या झोन क्रमांक २ अंतर्गत अमरावती–बडनेरा मुख्य मार्गावरील समर्थ हायस्कूल आणि गुलशन टॉवर परिसरात अनेकांनी रस्त्याच्या कडेला तात्पुरती दुकाने, लोखंडी केबिन आणि हातगाड्या उभारून अतिक्रमण केले होते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता.
मागील दोन दिवसांत या परिसरात घडलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर उपमहापौर सचिन भेंडे यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेने ही धडक कारवाई हाती घेतली. कारवाईसाठी जेसीबी यंत्राचा वापर करण्यात आला.
महापालिकेच्या पथकाने अतिक्रमित साहित्य हटवून तब्बल चार ट्रक भरून साहित्य जप्त केले. कारवाईदरम्यान आणखी दोन ट्रक मागविण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
मोहीम सुरळीत पार पडावी यासाठी घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच कोणत्याही प्रकारच्या राजकीय दबावाला बळी न पडता नियमांनुसारच कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित पथकाला देण्यात आल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.
या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे अमरावती–बडनेरा मुख्य मार्गावरील वाहतुकीला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहरातील इतर अतिक्रमित भागांवरही अशाच प्रकारची सातत्यपूर्ण आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



