amravatiAmravatiAmravatiMahanagarpalikaAmravatiMunicipalCorporationcitynews

कचऱ्याने भरलेला ट्रक थेट मनपा आवारात; संतप्त नागरिकांचा प्रशासनाविरोधात अनोखा निषेध

अमरावतीतील अस्वच्छतेच्या प्रश्नावर नागरिक आक्रमक; आयुक्तांच्या दालनात जोरदार वाद, पोलिसांना करावे लागले पाचारण

अमरावती : प्रतिनिधी

अमरावती शहरातील वाढत्या अस्वच्छतेच्या प्रश्नावर संतप्त झालेल्या नागरिकांनी सोमवारी थेट महानगरपालिकेच्या आवारात कचऱ्याने भरलेला ट्रक आणून प्रशासनाविरोधात तीव्र निषेध नोंदविला. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. या घटनेमुळे महानगरपालिका परिसरात एकच खळबळ उडाली.

राजापेठ आणि कवरनगर परिसरातील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याचे ढीग, नियमित साफसफाईचा अभाव आणि स्वच्छता व्यवस्थेतील त्रुटींमुळे त्रस्त आहेत. अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने अखेर नागरिकांचा संयम सुटला आणि त्यांनी कचऱ्याने भरलेला ट्रक थेट मनपा आवारात आणत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

घटनेनंतर मनपा परिसरात मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले. वाढता तणाव आणि नागरिकांचा आक्रोश लक्षात घेता प्रशासनाने तातडीने पोलिसांना पाचारण केले. सिटी कोतवाली पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यानंतर संबंधित प्रभागातील नगरसेवकांसह नागरिकांनी महानगरपालिका आयुक्त वर्षा लढ्ढा यांच्या दालनात धाव घेतली. यावेळी स्वच्छता अधिकारी डॉ. अजय जाधव हे देखील उपस्थित होते. बैठकीदरम्यान नागरिकांनी स्वच्छता विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना जाब विचारला.

बैठकीत काही नागरिकांनी डॉ. अजय जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, स्वच्छता विभागाच्या कामकाजाबाबत प्रश्न विचारल्यानंतर अधिकाऱ्यांकडून अयोग्य भाषेचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे बैठकीत बराच वेळ शाब्दिक वाद सुरू राहिला.

नागरिकांनी जबाबदार अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारची वर्तणूक अपेक्षित नसल्याचे सांगत प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी केली. तसेच शहरातील स्वच्छता व्यवस्थेतील त्रुटी तातडीने दूर करून नियमित साफसफाईची प्रभावी यंत्रणा उभी करावी, अशी मागणीही करण्यात आली.

दरम्यान, शहरातील विविध भागांमध्ये कचऱ्याची समस्या कायम असल्याने महानगरपालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यापूर्वीही महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्वच्छतेच्या मुद्द्यावर चर्चा झाली होती. मात्र त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे अमरावती महानगरपालिका प्रशासन अडचणीत सापडले असून शहरातील स्वच्छता प्रश्नावर तातडीने आणि प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने लवकर ठोस पावले उचलली नाहीत तर शहरभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.

आता नागरिकांना कथित धमकी दिल्याच्या आरोपांबाबत प्रशासन कोणती भूमिका घेते आणि शहरातील स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी कोणती पावले उचलते याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button