AmravatiAmravatiMahanagarpalikaAmravatiMunicipalCorporationcitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत अवैध मद्य वाहतुकीवर राजापेठ पोलिसांचा घाला; विदेशी दारूसह आरोपी जेरबंद

विकास कॉलनी परिसरात सापळा रचून कारवाई; 44 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त

अमरावती : प्रतिनिधी

अमरावती शहरातील अवैध मद्य वाहतुकीविरोधात राजापेठ पोलिसांनी मोठी कारवाई करत एका इसमाला विदेशी दारूसह रंगेहात पकडले आहे. गुप्त माहितीच्या आधारे विकास कॉलनी परिसरात सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपीकडून विविध ब्रँडच्या विदेशी दारूच्या बाटल्या आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली स्कुटी असा एकूण 44 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अवैध मद्य विक्री आणि वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राजापेठ पोलीस स्टेशनकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगार तपासणीसह अवैध देशी-विदेशी दारू विक्री व वाहतुकीविरोधात सातत्याने कारवाया सुरू आहेत.

याच मोहिमेदरम्यान पोलीस उपनिरीक्षक मिलिंद हिवरे आणि डीबी पथकाला गुप्त माहिती मिळाली की, विकास कॉलनी परिसरातून एक व्यक्ती स्कुटीवरून अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करीत आहे. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ परिसरात सापळा रचला.

संशयित व्यक्ती दिसताच त्याला थांबवून चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने आपले नाव प्रवीण ज्ञानेश्वर बगे (वय 52), रा. म्हाडा कॉलनी, अमरावती असे सांगितले.

यानंतर करण्यात आलेल्या झडतीदरम्यान आरोपीकडून मॅजिक मोमेंट, ग्लेनवॉक, बॅलेन्टाईन, रॉयल स्टॅग आणि ब्लेंडर्स प्राईड यांसारख्या विविध ब्रँडच्या विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी सुमारे 14 हजार 250 रुपयांची विदेशी दारू आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली 30 हजार रुपयांची टीव्हीएस स्कुटी जप्त केली. अशाप्रकारे एकूण 44 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कलम 65 (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राजापेठ पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे आणि सहायक पोलीस आयुक्त संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अवैध धंद्यांविरोधात अशाच धडक कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button