जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद; १६ गावांना २२ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा

चार तालुक्यांतील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या; ६६ विहिरींचे अधिग्रहण
जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे आणि भूजल पातळी घटल्याने पाणीटंचाईचे संकट गडद होत असून चार तालुक्यांतील १६ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या गावांमध्ये नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून २२ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील ६, अमळनेर तालुक्यातील ८ तर भुसावळ आणि पारोळा तालुक्यातील प्रत्येकी एका गावात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी आणि टँकर भरण्यासाठी एकूण ६६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून पाणीपुरवठ्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. आगामी काळात पाऊस लांबल्यास आणखी काही गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, पाणीटंचाईग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.



