Accident NewsAccidentNewscitynewsLatest NewsMaharashtraMumbaiThane

शहापूर-मुरबाड मार्गावर मिनी बसचा भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू

१६ प्रवाशांसह नाशिककडे निघालेल्या बसला अपघात; तिघे गंभीर जखमी, इतरांवर उपचार सुरू

शहापूर : प्रतिनिधी

शहापूर-मुरबाड मार्गावरील शेंद्रुण परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास १६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत बस चालकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर इतर प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मिनी बसमधून एकूण १६ प्रवासी प्रवास करत होते. हे सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असून अलिबाग येथून नाशिककडे परतत होते. पहाटेच्या वेळी बस शहापूर-मुरबाड मार्गावरून जात असताना शेंद्रुण येथील धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस रस्त्याच्या कडेला उतरून पलटी झाली आणि भीषण अपघात घडला.

या अपघातात बस चालक प्रभाकर गांगुर्डे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. बचावकार्य राबवून जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातात अश्विनी आकाश काळे (वय २७), पल्लवी वाल्मीक काठावटिक (वय २८) आणि कैलास हेमंत गायकवाड (वय २२) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर किरकोळ जखमी प्रवाशांवर शेंद्रुण प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले.

या अपघातामुळे काही काळ शहापूर-मुरबाड मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताची नोंद घेतली आहे. प्राथमिक तपासात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे समोर आले आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे मृत चालकाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून नाशिक जिल्ह्यातील संबंधित कुटुंबांमध्ये शोककळा पसरली आहे. परिसरातही या घटनेबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button