अमरावतीत मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश! 10 दुचाकींसह 3 अट्टल चोर जेरबंद

सिटी कोतवाली पोलिसांची धडक कारवाई; तीन अट्टल चोर अटकेत, 10 दुचाकींसह 3.60 लाखांचा मुद्देमाल जप्त
अमरावती प्रतिनिधी
अमरावती शहरातील मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनांवर सिटी कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन अट्टल मोटरसायकल चोरट्यांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीच्या तब्बल 10 मोटरसायकली जप्त केल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे 3 लाख 60 हजार रुपये आहे. या कारवाईमुळे शहरातील मोटरसायकल चोरांच्या टोळीला मोठा धक्का बसला असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 मे 2026 रोजी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास अमरावती येथील रहिवासी सागर वाकूडकर यांची होंडा युनिकॉर्न मोटरसायकल (क्रमांक MH-27 CP-1499) प्रभात चौक परिसरातून चोरीला गेली होती. या मोटरसायकलीची किंमत सुमारे 40 हजार रुपये होती.
घटनेच्या वेळी फिर्यादीचे चुलत मामेभाऊ शुभम गेडेकर यांनी मोटरसायकल तेथे उभी केली होती. काही वेळाने परत आल्यानंतर मोटरसायकल जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही वाहनाचा कोणताही मागमूस न लागल्याने 6 मे रोजी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा क्रमांक 218/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर सिटी कोतवाली पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राहुल संतोष सोळंके (वय 24, रा. कारंजा लाड, जि. वाशिम), लखन उत्तमराव चव्हाण (वय 26) आणि महादेव उत्तमराव चव्हाण (वय 28, दोघेही रा. अळणगाव, ता. भातकुली, जि. अमरावती) यांचा समावेश आहे.
पोलिसी चौकशीत आरोपींनी अमरावती शहरासह इतर भागांतही अनेक मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासात एकूण नऊ गुन्हे उघडकीस आले. आरोपींकडून विविध ठिकाणांहून चोरी करण्यात आलेल्या 10 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे 3 लाख 60 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या यशस्वी कारवाईमुळे शहरातील दुचाकी चोरीच्या अनेक घटनांचा उलगडा झाला असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली सिटी कोतवाली पोलिसांनी केलेल्या या उल्लेखनीय कारवाईचे नागरिकांकडून आणि विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
दरम्यान, आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून या प्रकरणाचा अधिक तपास सिटी कोतवाली पोलीस करीत आहेत.



