AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

“मेरे जीवन का अंतिम उपहार राष्ट्र के नाम” ; अमरावतीत भव्य नेत्रदान जनजागृती पदयात्रा, 37 दात्यांना श्रद्धांजली

अमरावती | प्रतिनिधी

विश्व नेत्रदान दिनानिमित्त अमरावती शहरात हरिना नेत्रदान समितीतर्फे भव्य नेत्रदान जनजागृती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. “मेरे जीवन का अंतिम उपहार राष्ट्र के नाम” या भावनिक संकल्पनेवर आधारित या पदयात्रेत 37 नेत्र आणि अवयव दात्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच दात्यांच्या कुटुंबियांचा कृतज्ञता गौरव करून समाजात नेत्रदानाबाबत जनजागृती करण्यात आली.

सायंकाळी राजकमल चौकातून हिरवा झेंडा दाखवून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. श्याम चौक, बापट चौक, सरोज चौक आणि जयस्तंभ चौक मार्गे निघालेल्या या पदयात्रेत शेकडो महिला, पुरुष, युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

हातात जनजागृतीचे फलक, नेत्रदानाचे संदेश आणि समाजप्रबोधनाची भावना घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. “नेत्रदान हेच श्रेष्ठ दान” आणि “मृत्यूनंतरही प्रकाश देण्याची संधी” असे संदेश देत नागरिकांना नेत्रदानासाठी प्रेरित करण्यात आले.

या कार्यक्रमाला सिने अभिनेते भरत गणेशपुरे, श्रीचंद तेजवानी, रवि राणा, यशोमती ठाकूर, तसेच जगदीश गुप्ता यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

पदयात्रेचा समारोप राजकमल चौकात करण्यात आला. यावेळी नेत्र आणि अवयव दात्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करून त्यांच्या सामाजिक योगदानाला सलाम करण्यात आला. त्यांच्या निर्णयामुळे अनेकांना नवजीवन मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान हरिना फाउंडेशनच्या वतीने लवकरच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया सेवा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. तसेच भविष्यात त्वचादान सुविधा सुरू करण्याचा मानसही व्यक्त करण्यात आला.

मान्यवरांनी नेत्रदान हे केवळ दान नसून दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारे महान कार्य असल्याचे सांगत नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. मृत्यूनंतरही एखाद्याच्या डोळ्यांतून दुसऱ्याला जग पाहण्याची संधी मिळू शकते, हा संदेश या पदयात्रेतून प्रभावीपणे देण्यात आला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button