मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; आजोबा आणि 11 वर्षीय नातवाचा जागीच मृत्यू

चांदवड | प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड घाटात मंगळवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात आजोबा आणि त्यांच्या 11 वर्षीय नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. चार वाहनांमध्ये झालेल्या या विचित्र अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चांदवडकडून मालेगावकडे जाणारी हायड्रा क्रेन, ॲपे रिक्षा, पिकअप आणि आयशर ट्रक यांच्यात मंगळवारी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास भीषण धडक झाली. राहुड घाटातील तीव्र उतारावर आणि गतिरोधकाजवळ हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले.
या दुर्घटनेत अब्दुल कय्युम अब्दुल रज्जाक (वय 62) आणि त्यांचा 11 वर्षीय नातू अब्दुल आहिल अब्दुल रहेमान यांचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अपघातात योगेश अशोक बाविस्कर (वय 27) आणि बारकू सुभाष वैद्य (वय 23, दोघेही रा. खडकी, ता. मालेगाव) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथे हलविण्यात आले.
दरम्यान, अपघातामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी हायड्रा क्रेनचा चालक अनुज संजय सिंह (वय 22) याला ताब्यात घेतले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.
घटनेची माहिती मिळताच मृत आणि जखमींच्या नातेवाईकांनी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
या अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून राहुड घाटातील वाहतुकीबाबत अधिक काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.



