विप्लव बाजोरियांना हायकोर्टाचा धक्का; उमेदवारी अर्ज प्रकरणात हस्तक्षेपास नकार

अमरावती | प्रतिनिधी
अमरावती विधान परिषद निवडणुकीतील अपक्ष उमेदवार तथा महायुतीचे बंडखोर नेते विप्लव बाजोरिया यांना नागपूर खंडपीठाकडून मोठा धक्का बसला आहे. उमेदवारी अर्ज फेटाळल्याच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यामुळे बाजोरिया यांना कोणताही अंतरिम दिलासा मिळालेला नाही.
या प्रकरणावर नागपूर खंडपीठात तब्बल अडीच ते तीन तास सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सर्व पक्षांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ आणि वकिलांनी आपापली बाजू न्यायालयासमोर मांडली. प्रवीण पोटे यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ मनोहर साहेब यांनी युक्तिवाद केला, तर महल्ले यांच्या वतीने ॲड. ऋषिकेश मरडीकर यांनी बाजू मांडली. हर्षजीत यांच्या वतीने ॲड. भंगडे यांनी युक्तिवाद केला, तर विप्लव बाजोरिया यांच्या वतीने ॲड. शिरपूरकर यांनी न्यायालयासमोर आपली भूमिका स्पष्ट केली.
सुनावणीदरम्यान ॲड. प्रशांत देशपांडे, संदीप गुप्ता, सुमित शर्मा, चंदू डोर्ले आणि रोहित उपाध्याय यांचीही उपस्थिती होती. सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
या निर्णयामुळे विधान परिषद निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हायकोर्टातून दिलासा न मिळाल्याने आता बाजोरिया यांच्यासमोर सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयानंतर अमरावतीच्या राजकीय वातावरणात नव्या चर्चांना उधाण आले असून पुढील कायदेशीर आणि राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता विप्लव बाजोरिया सर्वोच्च न्यायालयात जाणार का आणि पुढील भूमिका काय असणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.



