NEET पेपर लीक प्रकरणावर अभिजीत दीपकेंचा एल्गार; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, ६ जूनच्या आंदोलनाकडे देशाचे लक्ष

नवी दिल्ली : देशभरात खळबळ उडवणाऱ्या NEET पेपर लीक प्रकरणावर आता नव्या आंदोलनाची ठिणगी पडली आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अभिजीत दीपके यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत ६ जून रोजी दिल्लीत आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली असून विद्यार्थी वर्गातही या आंदोलनाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
अभिजीत दीपके यांनी अमेरिकेतून व्हिडिओ संदेश जारी करत भारतात परतण्याची घोषणा केली. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना जबाबदार धरलेच पाहिजे, असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
दीपके यांच्या दाव्यानुसार, NEET प्रकरणासंदर्भात सुरू केलेल्या ऑनलाइन याचिकेला आठ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा पाठिंबा मिळाला आहे. देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये वाढता असंतोष असून तो आता आंदोलनाच्या स्वरूपात पुढे येत असल्याचा दावा त्यांनी केला.
यावेळी त्यांनी NEET, CBSE, CUET आणि SSC GD परीक्षांमधील कथित गोंधळावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, एक कोटीहून अधिक विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्न निर्माण झाले असून इतक्या मोठ्या प्रमाणावर त्रुटी होत असताना जबाबदारी निश्चित न होणे ही चिंतेची बाब आहे.
अभिजीत दीपके ६ जून रोजी दिल्लीत पोहोचणार असून समर्थकांनी विमानतळावर एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यानंतर जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलनासाठी प्रशासनाकडे परवानगी मागण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
हा लढा पूर्णपणे संविधानिक आणि लोकशाही मार्गाने लढला जाईल, असे स्पष्ट करत दीपके यांनी त्यांना विमानतळावर अटक होण्याची शक्यता असल्याचाही दावा केला आहे. मात्र, “देशात लोकशाही जिवंत असेल तर शांततापूर्ण आंदोलनाला परवानगी मिळालीच पाहिजे,” असेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, या आंदोलनाची घोषणा झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. आता ६ जून रोजी होणाऱ्या प्रस्तावित आंदोलनाला किती प्रतिसाद मिळतो आणि त्याचा राष्ट्रीय स्तरावर काय परिणाम होतो, याकडे देशभरातील विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.



