CyberCrimeIndiaLatest NewsMaharashtraMaharashtraNewsNagpurNagpurCrimeNagpurPoliceStaySafeOnline

नागपूरमध्ये मॅट्रिमोनिअल अ‍ॅपद्वारे फसवणूक; खोटी माहिती देऊन विवाह व हुंड्यासाठी छळ, पतीसह कुटुंबीयांवर गुन्हा दाखल

नागपूर : मॅट्रिमोनिअल साईटवरून ओळख झालेल्या घटस्फोटित महिलेची फसवणूक करून खोटी माहिती देत विवाह केल्याचा आणि त्यानंतर हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याचा गंभीर प्रकार नागपूरच्या यशोधरा नगर परिसरात समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह त्याची आई आणि बहिण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, ३१ वर्षीय घटस्फोटित महिलेने पुनर्विवाहासाठी एका मॅट्रिमोनिअल अ‍ॅपवर प्रोफाईल तयार केला होता. याच माध्यमातून तिची ओळख राघवेंद्र युधिष्ठिर अवस्थी नावाच्या व्यक्तीशी झाली. सुरुवातीला आरोपीने स्वतःचे पहिले लग्न झाले असून पत्नीचे निधन झाल्याची माहिती दिली. या माहितीवर विश्वास ठेवून दोघांनी विवाह केला.

मात्र विवाहानंतर काही दिवसांतच धक्कादायक सत्य समोर आले. आरोपीची पहिली पत्नी जिवंत असल्याचे उघड झाले. दुसरे लग्न करण्याच्या उद्देशाने आरोपीने आणि त्याच्या कुटुंबीयांनी खोटी माहिती देऊन विवाह केल्याचा आरोप पीडित महिलेने तक्रारीत केला आहे.

यानंतर विवाहानंतरच्या काळात आरोपीकडून आणि त्याच्या कुटुंबीयांकडून हुंड्यासाठी पैशांची मागणी सुरू झाल्याचेही समोर आले आहे. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, पती, त्याची आई आणि बहीण यांनी मानसिक व शारीरिक छळ करत सतत पैशांची मागणी केली. हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने मारहाणही करण्यात आल्याचा आरोप आहे.

सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने यशोधरा नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी राघवेंद्र अवस्थी, त्याची आई आणि बहीण यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसेच हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून अशा प्रकारे इतर महिलांचीही फसवणूक झाली असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. जर कोणत्याही महिलेला या आरोपीकडून अशाच प्रकारे खोटी माहिती देऊन फसवले गेले असेल किंवा हुंड्यासाठी छळ झाला असेल, तर त्यांनी पुढे येऊन पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

या घटनेमुळे ऑनलाईन मॅट्रिमोनिअल अ‍ॅप्सवरील नात्यांमध्ये विश्वास आणि पडताळणी किती महत्त्वाची आहे, हा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button