अकोला जिल्हा कारागृहात 48 तासांत दोन विचाराधीन कैद्यांचा मृत्यू; कारागृह प्रशासनावर गंभीर प्रश्न

अकोला जिल्हा कारागृहातून एक धक्कादायक आणि गंभीर बातमी समोर आली आहे. अवघ्या 48 तासांच्या आत दोन विचाराधीन कैद्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कारागृह प्रशासन आणि आरोग्य व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दोन्ही कैद्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दोन मृत्यूंमुळे कारागृह व्यवस्थापनात मोठी खळबळ उडाली असून आता पोस्टमार्टम अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पहिली घटना 25 मे रोजी रात्री घडली. तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील दीपक रामदास चातारकर वय 42 यांची अचानक प्रकृती खालावली. हत्या प्रकरणात 22 मेपासून ते न्यायालयीन कोठडीत होते आणि न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना अकोला जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते.
जेल अधीक्षक महेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कैद्याची प्रकृती बिघडल्यानंतर जेल डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केली आणि तत्काळ सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
त्यानंतर दुसरी घटना 26 मे रोजी समोर आली. बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव येथील प्रल्हाद पांडुरंग रायपुरे वय 46 यांचीही अचानक प्रकृती बिघडली. त्यांना बुलढाणा कारागृहातून अकोला जेलमध्ये हलविण्यात आले होते.
प्राथमिक तपासणीनंतर त्यांना अकोला मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
प्रल्हाद रायपुरे हे हत्या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 अंतर्गत न्यायालयीन कोठडीत होते.
या दोन्ही प्रकरणांमध्ये कोतवाली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कोतवालीचे ठाणेदार संजय गवई यांनी तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे.
दोन्ही मृतदेहांचे दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत इन कॅमेरा पोस्टमार्टम करण्यात आले आणि त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान, या मृत्यूमागील नेमकं कारण काय, कारागृहातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहतंय का, की आणखी काही धक्कादायक बाब समोर येणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
अकोला जिल्हा कारागृहातील या दोन मृत्यूंमुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. कैद्यांच्या आरोग्य तपासणीपासून ते उपचार व्यवस्थेपर्यंत आता सखोल चौकशीची मागणी होत आहे. पोस्टमार्टम अहवालानंतर या प्रकरणात नेमकं सत्य काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



