मेळघाटातील विकासकामांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप; मांडवा गावातील निकृष्ट कामांवरून संताप

धारणी मेळघाटमध्ये विकासकामांच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार सुरू आहे का, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. टीचकुल्ले ठेकेदारामुळे मेळघाट हादरल्याची चर्चा असून शेकडो गावांमध्ये सुरू असलेल्या विकासकामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे आरोप होत आहेत. विशेषतः मांडवा गावातील नाला खोलीकरण आणि बंधाऱ्यांच्या कामामुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
धारणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये विविध शासकीय निधीतून विकासकामे सुरू आहेत. आमदार निधी, जिल्हा परिषद, सिंचन विभाग, कृषी विभाग आणि पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कामे सुरू असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.
मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असल्याचे चित्र समोर येत आहे. मांडवा गावात करण्यात आलेल्या नाला खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामात मोठ्या अनियमिततेचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ठेकेदाराने आपल्या मर्जीप्रमाणे काम करत आवश्यक नसलेल्या ठिकाणी देखील खोलीकरण केले. इतकेच नाही तर कोणत्याही तांत्रिक निकषांशिवाय एक नव्हे तर दोन बंधारे उभारण्यात आल्याचेही समोर आले आहे.
या बंधाऱ्यांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून फक्त बिल काढण्यासाठी हे काम करण्यात आल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
विशेष म्हणजे हे काम नेमके कोणत्या योजनेतून आणि कोणत्या निधीतून सुरू आहे याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याने संशय अधिक गडद झाला आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार विचारणा करूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आरोप केला जात आहे.
दरम्यान, संबंधित विभागाचे अधिकारी मात्र कागदोपत्री सर्व काही सुरळीत असल्याचे सांगत आहेत. मात्र प्रत्यक्ष वास्तव पाहता विकासकामांच्या नावाखाली शासकीय निधी लाटण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे मेळघाटातील विकासकामांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निकृष्ट कामांना जबाबदार कोण, शासकीय निधीचा हिशोब कोण देणार आणि या कथित गैरप्रकारांची चौकशी होणार का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.



