जालना जिल्ह्यात मिठाई दुकानातील बदाम शेकमध्ये आळ्या; ग्रामस्थांचा संताप, कठोर कारवाईची मागणी

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. पिंपळगाव रेणुकाई येथील एका नामांकित मिठाई दुकानातील खाद्यपदार्थांमध्ये वारंवार आळ्या आढळून येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. नुकत्याच एका नागरिकाने घेतलेल्या बदाम शेकमध्ये थेट आळ्या दिसून आल्याने गावात संतापाची लाट उसळली आहे. नागरिक आता संबंधित दुकानावर कठोर कारवाईची मागणी करत आहेत.
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे खाद्यसुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील एका प्रसिद्ध मिठाई दुकानात विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये आळ्या आढळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
नुकत्याच घडलेल्या घटनेत कृष्णा बेराड यांनी दुकानातून बदाम शेक खरेदी केला होता. मात्र शेक पित असताना त्यामध्ये आळ्या दिसून आल्याने त्यांना मोठा धक्का बसला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी दुकानाकडे धाव घेत संताप व्यक्त केला.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही पेढे आणि इतर मिठाईमध्ये आळ्या निघाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. मात्र तरीदेखील संबंधित दुकानावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
विशेष म्हणजे अनेक खाद्यपदार्थांवर एक्सपायरी डेट नसल्याचेही समोर आले आहे. दुकानातील स्वच्छतेवरही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभागावरही नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप होत आहे. नागरिकांनी तात्काळ तपासणी करून संबंधित दुकानावर कठोर दंडात्मक कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली आहे.
लहान मुलांसह सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. पिंपळगाव रेणुकाईतील या धक्कादायक प्रकारामुळे खाद्यसुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून अन्न व औषध प्रशासन या प्रकरणात नेमकी कोणती कारवाई करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



