Accident NewscitynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

रामटेकच्या अंबाळा परिसरात ब्रेक फेल झालेल्या ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; दोन वीज पोल कोसळले, मोठा अनर्थ टळला

रामटेक येथील विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबाळा परिसरात आज सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. खाजगी ट्रॅव्हल्सचा ब्रेक फेल झाल्याने घडलेल्या या अपघातात मोठी दुर्घटना टळली असली तरी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पाहूया सविस्तर बातमी.

रामटेक तालुक्यातील अंबाळा परिसरात आज सकाळी एक खाजगी ट्रॅव्हल्स वाहन क्रमांक DD 01 N 9898 गावात प्रवेश करत असताना अचानक ब्रेक फेल झाल्याची धक्कादायक घटना घडली.

नियंत्रण सुटलेले हे वाहन थेट विद्युत पोलवर जाऊन आदळले. या जोरदार धडकेत दोन विद्युत पोल कोसळले, तर वीजतारा तुटून परिसरातील वीजपुरवठा काही काळासाठी पूर्णपणे खंडित झाला.

सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखल्याने आणि वाहन वेळेत थांबल्यामुळे समोरील डीपीला धक्का बसला नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि जीवितहानी झाली नाही.

मात्र या अपघातात एक मोपेड स्कूटीचे मोठे नुकसान झाले आहे. गावात मोठ्या वाहनांना प्रवेश नसतानाही वाहने आत कशी शिरतात यावरून ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

गावाबाहेर पार्किंगची सुविधा असतानाही मोठ्या ट्रॅव्हल्सना गावात प्रवेश दिला जात असल्याने नागरिकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “आज पोल पडले, उद्या जीव जातील का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, अंबाळा परिसरातील कथित जुलमी वसुली बंद करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. यासंदर्भात रामटेक नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष रमेश कारामोरे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून मोठ्या वाहनांवर बंदी घालावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

तर ही होती रामटेक अंबाळा परिसरातील भीषण अपघाताची धक्कादायक माहिती. प्रशासन आता यावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button