बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार; “आमच्या पाठिंब्यामुळेच तुम्ही मुख्यमंत्री झालात”

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडूं यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. बच्चू कडूंना विधान परिषदेची आमदारकी मिळाल्यानंतर प्रहार संघटनेतील अनेक पदाधिकारी नाराज झाले असून, मराठवाड्यातील अनेक कार्यकर्त्यांनी शुक्रवारी उद्धव ठाकरें यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. ‘मातोश्री’ येथे झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडूंवर जोरदार टीका केली होती.
“आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता. घरी बोलावून त्याला मंत्री करणं ही माझी चूक झाली. लोभापायी गेलेल्यांना जाऊ द्या, पण कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत याचा आनंद आहे,” असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर बच्चू कडू यांनीही आक्रमक भूमिका घेत ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला.
पत्रकारांशी बोलताना बच्चू कडूंनी मोठा गौप्यस्फोट केला. “उद्धव ठाकरे यांनी मला कॅबिनेट मंत्रिपद देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र प्रत्यक्षात राज्यमंत्रिपद दिलं. माझ्याऐवजी शंकरराव गडाख यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं,” असा दावा त्यांनी केला. तसेच गोवाहाटीला जातानाही आपण उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती, असंही त्यांनी सांगितलं.
“आमच्या मतांमुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आम्ही त्यांच्या घरी जाऊन पाठिंबा दिला होता. संख्याबळासाठी त्यांनी आम्हाला गळ घातली होती. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून मला मंत्री करण्यात आलं,” असा आरोप बच्चू कडूंनी केला. यावेळी त्यांनी दिव्यांग मंत्रालय न दिल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली.
तसेच, “शिवसेना फुटल्याचं खापर माझ्यावर फोडू नका. उद्धव ठाकरे माझ्याबद्दल जे बोलले ते मनापासून बोलले असं वाटत नाही. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री केलं, मग आम्ही चूक केली असं म्हणणार का?” असा सवाल करत बच्चू कडूंनी ठाकरेंवर जोरदार पलटवार केला.
दरम्यान, बच्चू कडूंच्या या विधानांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं असून, महाविकास आघाडी आणि शिंदे गटातील आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



