संशोधन, नवोपक्रम आणि जागतिक अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राची भरारी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता, नवतंत्रज्ञान आणि मजबूत औद्योगिक परिसंस्थेच्या बळावर महाराष्ट्र देशात सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडी घेत असून संशोधन, नवोपक्रम आणि जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी भरारी घेत असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. “महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप आणि युनिकॉर्नची राजधानी असून पुढील दोन ते तीन वर्षांत महाराष्ट्र सिंगापूर आणि युएईलाही मागे टाकेल,” असा दावा त्यांनी केला.
मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित ‘इमॅजिनेक्स २०२६’ कार्यक्रमात रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील प्रगतीविषयी सविस्तर भूमिका मांडली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, २०१५ मध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुमारे १४ लाख कोटी रुपयांची होती, ती आता ५४ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या दहा वर्षांत राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आकार तिपटीहून अधिक वाढला आहे. सध्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ६६० बिलियन डॉलरवर पोहोचली असून देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टाच्या सर्वाधिक जवळ आहे.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचा सरासरी आर्थिक वृद्धीदर १० टक्के राहिला आहे. याच गतीने प्रगती कायम राहिल्यास २०३० पर्यंत महाराष्ट्र १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट निश्चितपणे गाठेल.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्र आता केवळ देशातील इतर राज्यांशी स्पर्धा करत नसून जगातील ३० वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येत आहे. पुढील दोन ते तीन वर्षांत महाराष्ट्र सिंगापूर आणि युएईच्या अर्थव्यवस्थेलाही मागे टाकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या उद्दिष्टासाठी तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हे ‘फोर्स मल्टिप्लायर’ म्हणून काम करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात भौगोलिक माहिती प्रणाली, डेटा ट्रॅकिंग आणि डेटा पूलचा प्रभावी वापर सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
‘विकसित महाराष्ट्र २०४७’ हे दीर्घकालीन व्हिजन तयार करण्यात आले असून २०३०, २०३५ आणि २०४७ अशी अल्पकालीन, मध्यकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टे निश्चित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी आर्थिक सल्लागार समिती आणि ‘व्हिजन मॅनेजमेंट युनिट’ स्थापन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्रात सामंजस्य करारांचे प्रत्यक्ष गुंतवणुकीत रूपांतर होण्याचे प्रमाण देशातील सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. दावोस येथे झालेल्या करारांपैकी तब्बल ८५ टक्के करार प्रत्यक्ष गुंतवणुकीत रूपांतरित झाले आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील कामकाजाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, राज्य शासनाने स्वतंत्र ‘एआय’ विभाग आणि आयुक्तालय स्थापन केले आहे. प्रशासनात एआयचा वापर सुरू करण्यात आला असून गुन्हे तपास प्रणालीपासून दोषारोपपत्रापर्यंत संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आणि ब्लॉकचेन आधारित करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘महाविस्तार’ ॲपचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील ५० लाख शेतकऱ्यांनी हे ॲप डाउनलोड केले आहे. कृषी क्षेत्रातील सर्व माहिती आणि मार्गदर्शन देणारे हे ‘वन स्टॉप सोल्यूशन’ असून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एजंट शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत. विशेष म्हणजे या ॲपमध्ये ‘भिल्ली’ या आदिवासी भाषेचाही समावेश करण्यात आला आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात भारतासारख्या तरुण देशासाठी मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवतंत्रज्ञान स्वीकारण्याचे आवाहन केले. “भारताची ६५ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या ३५ वर्षांखालील आहे. त्यामुळे एआयचा स्वीकार करणे भारतासाठी अजिबात कठीण नाही,” असेही ते म्हणाले.



