BhandaracitynewsLatest NewsMaharashtra

अड्याळ महसूल विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

भंडारा जिल्ह्यातील अड्याळ महसूल विभागाचा भोंगळ कारभार आता चव्हाट्यावर आला आहे. कार्यालयात अधिकारी गैरहजर राहणे, नागरिकांना तासन्तास दारात ताटकळत ठेवणे आणि फोनवर उद्धट भाषेत उत्तर दिले जात असल्याचा गंभीर आरोप मंडळ अधिकारी शेंडे यांच्यावर करण्यात आला आहे. या मनमानी कारभारामुळे संतप्त नागरिकांनी आता थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पवनी तालुक्यातील अड्याळ महसूल विभागातील कारभारावर नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. महसूल दाखले, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र तसेच विविध शासकीय कामांसाठी ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक किलोमीटरचा प्रवास करून कार्यालयात यावे लागते.

मात्र कार्यालयात पोहोचल्यानंतर मंडळ अधिकारी वारंवार अनुपस्थित असल्यामुळे नागरिकांची कामे रखडत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अनेकांना दिवसभर प्रतीक्षा करूनही काम न झाल्याने रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.

नागरिकांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी फोन केल्यास “हा माझा खाजगी नंबर आहे” अशा उद्धट भाषेत उत्तर दिले जात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाविषयी नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे कार्यालयाबाहेर संपर्क क्रमांक, भेटीची वेळ आणि आवश्यक माहिती दर्शवणारे फलकही नसल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे दूरवरून येणाऱ्या नागरिकांना अधिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या संपूर्ण प्रकाराबाबत तहसीलदारांकडे तक्रार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

संबंधित अधिकाऱ्याची तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.

शासकीय कार्यालय हे जनतेच्या सेवेसाठी असताना अड्याळ महसूल विभागातील कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आता प्रशासन या गंभीर आरोपांची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button