राज्यपालांच्या हस्ते भिकू इदाते आणि रवींद्र प्रभूदेसाई यांच्या पुस्तकांचे प्रकाशन; “वाढदिवस आणि विवाहात ग्रंथ भेट देण्याची परंपरा सुरू व्हावी”

मुंबईतील लोकभवन येथे आयोजित विशेष कार्यक्रमात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते पद्मश्री भिकू इदाते आणि उद्योजक डॉ. रवींद्र प्रभूदेसाई यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी राज्यपालांनी वाचन संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करत वाढदिवस तसेच विवाह प्रसंगी ग्रंथ भेट देण्याची प्रथा सुरू व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
भटके विमुक्त विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आणि समरसता मंचचे दीर्घकाळ कार्याध्यक्ष राहिलेले पद्मश्री भिकू इदाते यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘समरसतेचा वारकरी’ या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद ‘पिलग्रीम ऑफ समरसता’ या नावाने प्रकाशित करण्यात आला. मूळ पुस्तक लेखिका नीलिमा देशपांडे यांनी लिहिले असून त्याचे इंग्रजी भाषांतर ऋतुराज पत्की यांनी केले आहे. या पुस्तकाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची प्रस्तावना लाभली आहे.
याच कार्यक्रमात पितांबरी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभूदेसाई यांच्या ‘आधुनिक शेतीचे मॉडेल’ आणि ‘आपलं कोकण’ या दोन पुस्तकांचेही प्रकाशन करण्यात आले.
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आपल्या भाषणात सांगितले की, तंत्रज्ञानाच्या युगातही पुस्तकांचे महत्त्व कायम आहे. हातात पुस्तक घेऊन वाचन करण्याचा अनुभव अद्वितीय असतो. नवी पिढी वाचन करत नाही हा समज चुकीचा असून त्यांनी फक्त वाचनाचे माध्यम बदलले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
भिकू इदाते यांच्या पुस्तकामुळे वाचकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समरसता आंदोलनाची तसेच सामाजिक कार्याची माहिती मिळेल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.
भिकू इदाते यांनी आपल्या मनोगतात समरसता मंचाच्या स्थापनेपासून विविध सामाजिक आंदोलनांपर्यंतचा प्रवास उलगडला. फुले-आंबेडकर संदेश यात्रा, विमुक्त आणि भटक्या समाजाची परिस्थिती यांसारख्या विषयांवर त्यांनी सविस्तर भाष्य केले.
डॉ. रवींद्र प्रभूदेसाई यांनी ‘आधुनिक शेतीचे मॉडेल’ आणि ‘आपलं कोकण’ या पुस्तकांमागील संकल्पना स्पष्ट करत शेती आणि कोकणाच्या विकासाशी संबंधित विविध अनुभव मांडले.
या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास हिंदुस्तान प्रकाशन संस्था आणि साप्ताहिक विवेकचे मार्गदर्शक पद्मश्री रमेश पतंगे, साप्ताहिक विवेकचे प्रतिनिधी तसेच पितांबरी उद्योग समूहातील पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.



