citynewsLatest NewsMaharashtra

‘भारत फोरकास्ट सिस्टम’ वापरणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; आपत्ती व्यवस्थापनात मोठी झेप

मुंबई : अत्याधुनिक हवामान अंदाज प्रणाली ‘भारत फोरकास्ट सिस्टम’ अर्थात भारतFS चा वापर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या नव्या प्रणालीमुळे हवामान पूर्वसूचना, स्थानिक पातळीवरील आपत्तीपूर्व तयारी आणि तातडीच्या प्रतिसाद व्यवस्थेमध्ये मोठी सुधारणा होणार असल्याची माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था अर्थात आयआयटीएम, पुणे यांच्यासोबत सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन क्षमतेत मोठी वाढ होणार असून अतिवृष्टी, पूर, वादळ आणि उष्णतेच्या लाटांसारख्या संकटांचा सामना अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.

भारत सरकारच्या भारतीय हवामान विभागाच्या ‘मिशन मौसम’ अंतर्गत विकसित करण्यात आलेली स्वदेशी ‘भारत फोरकास्ट सिस्टम’ आता महाराष्ट्राच्या निर्णयप्रक्रियेत थेट वापरली जाणार आहे. राज्य आपत्कालीन कार्य संचालन केंद्र आणि भू-स्थानिक निर्णय सहाय्य प्रणालीच्या माध्यमातून ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.

या प्रणालीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती ६ किलोमीटर बाय ६ किलोमीटर इतक्या सूक्ष्म स्तरावर अचूक हवामान अंदाज देऊ शकते. यामुळे ग्रामपंचायत आणि उपतालुका स्तरापर्यंत हवामानाची माहिती उपलब्ध होणार आहे. याआधी १२ किलोमीटर बाय १२ किलोमीटर स्तरावरील अंदाज उपलब्ध होते.

या नव्या प्रणालीमुळे उष्णतेची लाट, मुसळधार पाऊस, वादळ, पूर आणि भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तींबाबत अधिक वेगवान आणि प्रभावी पूर्वसूचना देता येणार आहे. हवामानासंबंधी माहिती दर तीन तासांनी अद्ययावत केली जाणार असून पर्जन्यमान, तापमान, वातावरणीय दाब, वाऱ्याचा वेग आणि दिशा तसेच ढगांचे प्रमाण याबाबत जवळपास प्रत्यक्ष वेळेत माहिती उपलब्ध होईल.

या उपक्रमांतर्गत नागरिकांसाठी तीन तासांच्या अंतराने उच्च-रिझोल्यूशन हवामान अंदाज, प्रभावाधारित पूर्वसूचना, स्वयंचलित अलर्ट प्रणाली तसेच सायरन, मोबाईल संदेश आणि सार्वजनिक प्रसारणाद्वारे एकाच वेळी सूचना देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यातील नागरिकांपर्यंत वेळेत इशारे पोहोचवणे अधिक प्रभावी होणार आहे.

आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंगल यांनी सांगितले की, या सहकार्यामुळे राज्य आणि जिल्हास्तरावरील निर्णयप्रक्रिया अधिक वेगवान आणि माहितीआधारित होईल. तर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे संचालक डॉ. भालचंद्र चव्हाण यांनी या प्रणालीमुळे वैज्ञानिक हवामान माहिती थेट स्थानिक प्रशासनापर्यंत पोहोचणार असल्याचे सांगितले.

नागरिकांनी हवामान पूर्वसूचना आणि आपत्ती संदर्भातील अधिकृत माहिती एसडीएमएच्या माध्यमांतून नियमितपणे घेत राहावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन मदतीसाठी एसडीएमए हेल्पलाईन १०७०, जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष १०७७ आणि रुग्णवाहिका सेवा १०८ हे क्रमांक उपलब्ध आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button