“इंधन बचतीसाठी दिल्ली सरकारचा मोठा निर्णय; आठवड्यातून दोन दिवस ‘वर्क फ्रॉम होम’ची सूचना”

वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. इंधन बचतीसाठी खासगी कंपन्यांना आठवड्यातून किमान दोन दिवस ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर इंधनाच्या किमती वाढत आहेत. कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या दरांवर परिणाम होत आहे.
या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने इंधन बचतीसाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. राज्यातील खासगी कंपन्यांना आठवड्यातून किमान दोन दिवस ‘वर्क फ्रॉम होम’ लागू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच कार्यालयीन वेळा विभागून ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतुकीवरील ताण कमी होऊन कर्मचाऱ्यांना कारपूलिंग करण्यास मदत होईल, असा सरकारचा दावा आहे.
दिल्ली सरकारने नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करण्याचेही आवाहन केले आहे. दरम्यान, विमान इंधनावरील व्हॅट २५ टक्क्यांवरून थेट ७ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. त्यामुळे विमान कंपन्या आणि प्रवाशांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी ‘माझा भारत, माझे योगदान’ या नावाने ९० दिवसांची मोहीम सुरू केली असून सरकारी बैठकींपैकी ५० टक्के बैठका ऑनलाइन घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
इंधन बचत आणि वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी दिल्ली सरकारने उचललेली ही पावले देशभरात चर्चेचा विषय ठरत आहेत.



