“विदर्भात उष्णतेचा कहर; वर्धा ४६ अंशांवर, नागरिक हैराण”

विदर्भात सध्या प्रचंड उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. वर्धा आणि अमरावतीसह अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने ४६ अंशांचा टप्पा गाठला असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळी १० वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढत असल्याने दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडलेले दिसत आहेत.
वर्धा हे देशातील सर्वाधिक उष्ण शहरांपैकी एक ठरत असून येथे तब्बल ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उष्णतेमुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. दुपारच्या वेळेत रस्त्यांवरील वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसत आहे.
उष्णतेच्या वाढत्या तडाख्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता, डोकेदुखी, थकवा आणि उष्माघाताच्या तक्रारी वाढत आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने दक्षिण अंदमानमध्ये मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली असली तरी विदर्भात मात्र उन्हाचा कहर कायम आहे. अमरावती जिल्ह्यातही काल ४६ अंश तापमानाची नोंद झाली.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र २१ ते २२ मेनंतर मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून त्यामुळे तापमानात काही प्रमाणात घट होण्याचा अंदाज आहे.
सध्या तरी विदर्भातील नागरिकांना उष्णतेच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत असून सर्वांच्या नजरा आता मान्सूनपूर्व पावसाकडे लागल्या आहेत.



