कुलरच्या पाण्यावरून नागपुरात रक्तरंजित हाणामारी; सुगत नगरमध्ये चाकू हल्ल्यात दोघे जखमी

नागपूर : नागपुरातील सुगत नगर परिसरात कुलरच्या सांडपाण्यावरून दोन शेजारी कुटुंबांमध्ये झालेला किरकोळ वाद रक्तरंजित हाणामारीत बदलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हिंसक संघर्षात चाकू हल्ला झाल्याने दोघेजण गंभीर जखमी झाले असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या सुगत नगर परिसरात कुलरमधून वाहणाऱ्या सांडपाण्यावरून दोन शेजारी कुटुंबांमध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर हा वाद काही वेळातच विकोपाला गेला आणि दोन्ही बाजूंमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली.
वाद इतका वाढला की, संतापाच्या भरात चाकू हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात नरेश कडू आणि अंकित नांदुरकर हे दोघे गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. जखमींना तातडीने उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ही घटना कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी दोन्ही पक्षांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, या वादामागील नेमकं कारण आणि चाकू हल्ल्याची पार्श्वभूमी याचा सखोल तपास सुरू आहे.
किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद थेट रक्तपातापर्यंत पोहोचल्याने सुगत नगर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
नागपुरात क्षुल्लक कारणांवरून वाढत चाललेली हिंसक प्रवृत्ती पुन्हा एकदा समोर आली असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.



