महिला बचत गटाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक! नागपुरात महिलांची टोळी जेरबंद

नागपूर : महिलांना आर्थिक लाभाचे आमिष दाखवत महिला बचत गटाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूर शहरात उघडकीस आला आहे. आरोपी महिलांनी गुंतवणूक आणि कर्जाच्या नावाखाली अनेक महिलांची फसवणूक करत तब्बल १० लाख ५० हजार रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात आरोपी महिलांनी स्वतःला महिला बचत गटाच्या प्रतिनिधी म्हणून सादर करत परिसरातील महिलांचा विश्वास संपादन केला. “महिला सक्षमीकरण”, “बचत आणि कर्ज सुविधा” अशा गोंडस नावाखाली महिलांना आर्थिक योजनेत सहभागी होण्याचे आमिष दाखवण्यात आले.
आरोपींनी महिलांना १२ महिन्यांपर्यंत रक्कम जमा केल्यास दरमहा ३ टक्के व्याज देण्याचे आश्वासन दिले. याशिवाय गरजू महिलांना कमी व्याजदरात लहान कर्ज उपलब्ध करून देण्याचं आमिषही दाखवण्यात आलं.
या आश्वासनांना भुलून अनेक महिलांनी आपल्या मेहनतीची बचत या गटात जमा केली. सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी गोड बोलून महिलांना जाळ्यात ओढण्यात आलं. मात्र काही दिवसांनी ना व्याज मिळालं, ना मूळ रक्कम परत मिळाली.
फिर्यादी महिलांनी पैसे परत मागितल्यानंतर आरोपी महिलांनी उडवाउडवीची उत्तरं देण्यास सुरुवात केली. त्यानंतर पैसे मागणाऱ्या महिलांना धमकावण्याचाही प्रकार समोर आला.
या संपूर्ण फसवणुकीत एकूण १० लाख ५० हजार रुपयांची रक्कम लाटण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणातील महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिस सध्या या टोळीचा सखोल तपास करत असून, या फसवणुकीत आणखी कोणी सहभागी आहे का, तसेच इतर महिलांनाही अशाच प्रकारे गंडा घालण्यात आला आहे का, याचा शोध घेत आहेत.
पोलिसांचं नागरिकांना आवाहन
पोलिसांनी नागरिकांना अशा योजनांपासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. कोणतीही बचत योजना, गुंतवणूक योजना किंवा बचत गटात पैसे गुंतवण्यापूर्वी त्याची संपूर्ण पडताळणी करावी, नोंदणी तपासावी आणि संबंधित कागदपत्रांची खात्री करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
“जलद नफा”, “मोठं व्याज”, “सुरक्षित गुंतवणूक” अशा आमिषांना बळी पडणं अनेकदा आर्थिक संकटात ढकलू शकतं. त्यामुळे नागरिकांनी सावध राहून कोणतीही आर्थिक गुंतवणूक करताना शंभर वेळा विचार करणं गरजेचं आहे.



