Uncategorized

प्रलंबित मागण्यांवर विद्यापीठीय सेवक आक्रमक; जळगावात २७ एप्रिलला निर्णायक बैठक

महाराष्ट्र राज्यातील अकृषी विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन सेवकांच्या प्रलंबित प्रश्नांवर शासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती आक्रमक झाली आहे.

आंदोलनाची पुढील दिशा आणि धोरण निश्चित करण्यासाठी सोमवार, २७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे सर्व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.

यापूर्वी २ मार्च २०२६ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे झालेल्या बैठकीत प्रलंबित मागण्यांबाबत शासनाला निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्या निवेदनावर अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने विद्यापीठीय तसेच महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

तीन लाभांच्या आश्वासित प्रगती योजनेसह इतर विविध प्रश्नांवर आता प्रत्यक्ष आंदोलन सुरू करण्याच्या दृष्टीने जळगाव येथील बैठकीत सखोल चर्चा होणार असून, आंदोलनाचा अंतिम आराखडा निश्चित केला जाणार आहे.

या बैठकीसाठी राज्यातील सर्व विद्यापीठ कर्मचारी संघटना आणि महाविद्यालयीन कर्मचारी संघटनांना पत्राद्वारे कळविण्यात आले असून, मोठ्या संख्येने प्रतिनिधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, संयुक्त कृती समितीचे प्रमुख अजय बळवंत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. तसेच श्री मिलींद भोसले, श्री रावसाहेब त्रिभुवन, श्री प्रकाश म्हसे, श्री दिनेश दखने, डॉ. कैलास पाथ्रीकर, श्री आनंद खामकर, श्री अरून सपकाळे, श्री संदीप हिवरकर, श्री अशोक रानवडे यांसह इतर पदाधिकारी आणि विविध कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

राज्यातील सर्व विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लक्ष आता जळगाव येथील या बैठकीकडे लागले असून, येथूनच मोठ्या आंदोलनाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button