“स्वच्छतेच्या दाव्यांना तडा; प्रभाग १० मधील सार्वजनिक शौचालयांची दयनीय अवस्था उघड”

अमरावती महानगरपालिकेच्या स्वच्छतेच्या दाव्यांना प्रभाग क्रमांक १० मधील वास्तवाने मोठा धक्का दिला आहे. स्वच्छ भारत मिशन आणि स्वच्छ सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छ ठेवण्याचे दावे केले जात असताना, संजय गांधी नगर आणि वडारपुरा परिसरातील सार्वजनिक शौचालयांची अत्यंत बिकट अवस्था समोर आली आहे. यामुळे महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
संजय गांधी नगर क्रमांक १, संजय गांधी नगर क्रमांक २ आणि वडारपुरा या भागांमध्ये अनेक शौचालयांचे दरवाजे तुटलेले, पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही, विद्युत पुरवठा खंडित आणि काही ठिकाणी शौचालये बंद अवस्थेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. स्वच्छ सर्वेक्षणाच्या निकषांनुसार शौचालये स्वच्छ, सुरक्षित आणि सुविधायुक्त असणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात परिस्थिती पूर्णपणे विपरीत असल्याचे दिसत आहे.
महिलांसाठी राखीव शौचालये बंद असल्याने त्यांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे. दरवाजेविना शौचालयांचा वापर करणे विशेषतः रात्रीच्या वेळी धोकादायक ठरत आहे. याशिवाय, काही ठिकाणी दुमजली शौचालये उभारण्यात आली असली तरी पहिल्या मजल्यावरील सफाई कामगारांची राहण्याची व्यवस्था काही कंत्राटदारांनी भाड्याने दिल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे सफाई कामगार नियमित हजर राहत नसल्याचेही नागरिकांनी सांगितले आहे.
संजय गांधी नगर क्रमांक २ मध्ये नागरिक स्वतःच शौचालयांची साफसफाई करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. “स्वच्छ भारत मिशन”च्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च दाखवला जात असताना नागरिकांना मूलभूत सुविधा न मिळाल्याने मनपा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नागरिकांनी तात्काळ साफसफाई, पाणीपुरवठा आणि दुरुस्ती करण्यासह संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
स्वच्छतेच्या दाव्यांमध्ये आणि प्रत्यक्ष स्थितीत असलेली ही दरी चिंताजनक असून, आता तरी मनपा प्रशासन यावर तातडीने पावले उचलते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



