२००६ मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा दिलासा; मुंबई उच्च न्यायालयाकडून चार आरोपींची निर्दोष मुक्तता

२००६ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आज मोठा निर्णय देत चार आरोपींना दिलासा दिला आहे. विशेष न्यायालयाने त्यांच्याविरोधात ठेवलेले आरोप उच्च न्यायालयाने रद्द केले असून, चारही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती श्याम चंदक यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. राजेंद्र चौधरी, धनसिंग, मनोहर रामसिंग नरवारिया आणि लोकेश शर्मा या चार आरोपींनी विशेष न्यायालयाच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. न्यायालयाने त्यांची अपिले मंजूर करत आरोपपत्रातील आरोप रद्द केले.
या चार आरोपींविरोधात विशेष न्यायालयाने यापूर्वी खून, कटकारस्थान आणि दहशतवादविरोधी कायद्यांखाली आरोप निश्चित केले होते. मात्र, उच्च न्यायालयाने उपलब्ध पुरावे आणि तपासातील त्रुटी लक्षात घेत, त्यांच्याविरोधात आरोप कायम ठेवण्यास पुरेसा आधार नसल्याचे नमूद केले.
२००६ मध्ये मालेगाव येथील हमीदिया मशिदीजवळ आणि कब्रस्तान परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटात ३७ जणांचा मृत्यू झाला होता, तर शेकडो जण जखमी झाले होते. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला महाराष्ट्र एटीएसकडे होता, त्यानंतर सीबीआय आणि नंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA कडे हा तपास सोपवण्यात आला होता.
या निर्णयामुळे तब्बल दोन दशकांपासून सुरू असलेल्या या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. आता राज्य सरकार किंवा तपास यंत्रणा या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



