agriculturecitynewsJalgaonLatest NewsMaharashtra

वीजतार तुटून मक्याच्या शेताला आग; रावेरच्या वाघोडमध्ये शेतकऱ्याचे मोठे नुकसान

रावेर तालुक्यातील वाघोड शिवारात एक धक्कादायक घटना घडली आहे. मुख्य वीजवाहिनीचा तार तुटून पडल्याने लागलेल्या आगीत शेतकऱ्याच्या मक्याचे पीक जळून खाक झाले. ऐन काढणीच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

ही घटना वाघोड शिवारातील मोरगाव रोडलगत घडली. शेतकरी प्रदीप पाटील यांनी तिसऱ्या हिस्सा पद्धतीने केलेल्या शेतीत मका पिकवला होता. चार महिन्यांच्या मेहनतीनंतर पीक काढणीसाठी तयार झाले होते. मात्र अचानक मुख्य वीजतार तुटून जमिनीवर पडला आणि त्यातून झालेल्या स्पार्किंगमुळे मक्याच्या शेताला आग लागली.

सुदैवाने, आग लागली तेव्हा प्रदीप पाटील घटनास्थळीच होते. त्यांनी तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ मदतीसाठी धावले. रावेर नगरपालिकेच्या अग्निशमन दलालाही बोलावण्यात आले. अग्निशमन दल आणि ग्रामस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली.

मात्र, तोपर्यंत अर्धा ते पाऊण एकर परिसरातील मका जळून खाक झाला होता. या आगीत अंदाजे २० क्विंटल उत्पादनाचे नुकसान झाले असून, सध्याच्या बाजारभावानुसार सुमारे ३४ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आधीच अवकाळी पाऊस, खत-बियाण्यांचे वाढते दर आणि शेतीचा वाढलेला खर्च यामुळे शेतकरी अडचणीत आहे. अशातच या आगीने प्रदीप पाटील यांच्यावर आणखी आर्थिक संकट ओढवले आहे.

पीडित शेतकऱ्याने प्रशासनाकडे तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच, वीज विभागाने अशा धोकादायक जुन्या तारांची तपासणी करून तातडीने दुरुस्ती करावी, अशीही मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

“चार महिन्यांची मेहनत काही मिनिटांत राख झाली… आता प्रशासनाने तरी शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहावं,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button