आईच्या त्यागाला मानाचा मुजरा – अमरावतीत ‘जिजाऊ मातृसन्मान पुरस्कार 2026’ सोहळा उत्साहात

अमरावतीत आईच्या त्याग, संघर्ष आणि मायेचा गौरव करणारा एक भावनिक आणि प्रेरणादायी सोहळा पार पडला. अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित ‘राज्यस्तरीय राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मातृसन्मान पुरस्कार 2026’ कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनाने झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आईच्या भूमिकेवर प्रकाश टाकत, “आई म्हणजे मायेचा अथांग सागर… संकट कितीही मोठं असलं तरी मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी शक्ती म्हणजे आई” असे भावनिक विचार व्यक्त केले.
यंदाचा जिजाऊ मातृसन्मान पुरस्कार संघर्षाची जिवंत कहाणी ठरलेल्या श्रीमती प्रमिलाबाई उत्तमराव कडू यांना प्रदान करण्यात आला. पतीच्या निधनानंतर अत्यंत कठीण परिस्थितीत शेती करत पाच लहान मुलांचा सांभाळ करणाऱ्या प्रमिलाबाईंनी समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे.
या सोहळ्याला आमदार सुलभाताई खोडके, डॉ. शंकर अडाणी, डॉ. वैभव निमकर, डॉ. हरिभाऊ काळे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमात विविध सांस्कृतिक सादरीकरणांनीही रंगत आणली.
👉 आईच्या त्यागाला सलाम करणारा हा सोहळा केवळ सन्मान नाही, तर समाजाला प्रेरणा देणारा एक जिवंत संदेश ठरला आहे.



