मध्य प्रदेशात मुलं-गावकऱ्यांनी वाचवला हरणाचा जीव; भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यातून थरारक सुटका

मध्य प्रदेशमधील छत्तरपूर जिल्ह्यातील शाहगढ ग्रामपंचायत परिसरात एक हरण भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली. मात्र, प्रसंगावधान राखत मुलं आणि गावकऱ्यांनी या हरणाचा जीव वाचवला.
मिळालेल्या माहितीनुसार, बजना फॉरेस्ट रेंज परिसरातील जंगल आक्रसल्यामुळे हे हरण घाबरलेल्या अवस्थेत थेट गावात शिरले. काही क्षणांतच भटक्या कुत्र्यांच्या कळपाने त्याच्यावर हल्ला चढवत त्याला घेरले आणि चावा घेण्यास सुरुवात केली.
या वेळी गावातील मुलांनी धाडस दाखवत कुत्र्यांना हुसकावण्यासाठी ओरडत दगडफेक सुरू केली. परिस्थिती गंभीर होताच इतर गावकरीही काठ्या घेऊन धावून आले. मोठ्या प्रयत्नांनंतर कुत्र्यांना पळवून लावत जखमी हरणाची सुटका करण्यात आली.
त्यानंतर या हरणाला सुरक्षितपणे केरखोरा जंगल परिसरात सोडण्यात आले.
मात्र, या घटनेनंतर वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. माहिती देऊनही अधिकारी तब्बल दोन तास उशिरा घटनास्थळी पोहोचल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून, “जंगल कमी होत आहे म्हणून प्राणी गावात येतात, पण मदतीसाठी फोन केल्यावर कोणीच येत नाही,” अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली.
या घटनेमुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



