चेन्नईमध्ये एलपीजी सिलिंडरचा भीषण स्फोट; दोन चिमुकल्यांचा मृत्यू, सात जण गंभीर जखमी

चेन्नईमध्ये रविवारी सकाळी एलपीजी सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली. या स्फोटात दोन लहान मुलांचा होरपळून मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी सुमारे ७:४० वाजण्याच्या सुमारास चेन्नई दक्षिणेतील ओएमआर परिसरातील नवलूर येथील चामुंडेश्वर नगरमध्ये घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, चामुंडेश्वर नगरमधील तिसऱ्या स्ट्रीटवरील एका घरात अचानक एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की शेजारील दोन घरेही आगीच्या विळख्यात सापडली. तीन घरे एकमेकांना लागून असल्याने काही क्षणांतच आगीने तिन्ही घरांना वेढा घातला.
आज रविवार असल्याने घरातील सर्व सदस्य घरीच होते. त्यामुळे स्फोट झाल्यानंतर मोठी जीवितहानी झाली. या आगीत एकाच कुटुंबातील दोन भावंडांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर भाजले आहेत. स्फोटाच्या तीव्रतेमुळे तिन्ही घरे कोसळली असून ढिगाऱ्याखाली काहीजण अडकले होते.
स्फोटाचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तात्काळ पोलिस व अग्निशमन दलाला माहिती दिली. माहिती मिळताच थझांबूर पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ बचावकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढले.
जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी या दुर्घटनेचा तपास सुरू केला असून स्फोट नेमका कशामुळे झाला याचा शोध घेतला जात आहे.



