IMD Weather Update : हवामानात मोठा बदल; अवकाळीचे संकट टळले, पुढील २४ तासांत उकाडा वाढणार

मुंबई/प्रतिनिधी: राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होत असून कधी पाऊस तर कधी उकाडा अशी परिस्थिती अनुभवायला मिळत आहे. अवकाळी पावसाने राज्याला चांगलेच झोडपून काढल्यानंतर आता हे संकट टळल्याचे चित्र आहे. पुढील २४ तासांत तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
भारतीय हवामान विभाग (IMD) ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आता उन्हाचा कडाका वाढणार असून तापमानात चढ-उतार कायम राहतील. मागील चार ते पाच दिवसांपासून अवकाळी पावसाने अनेक भागात धुमाकूळ घातला होता. गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
फेब्रुवारी महिन्यात थंडी जवळपास नाहीशी झाली आहे. डिसेंबरमध्ये काही भागात म्हणावी तशी थंडी जाणवली, तर उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली होती. मात्र राज्यात तीव्र शीतलहरी दाखल झाल्या नाहीत. १ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या जोरदार पावसानंतर राज्यातील थंडी पूर्णपणे कमी झाली.
देशातील नीचांकी तापमानाची नोंद भटिंडा (पंजाब) येथे झाली असून तेथे १० अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
राज्यातील नीचांकी तापमान धुळे येथे १२.२ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.
तर राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद अकोला येथे झाली असून तेथे ३६.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
राज्यात दुपारच्या वेळी उकाडा तीव्र होत असून घराबाहेर पडणे कठीण होत आहे. पुढील काही दिवसांत उन्हाचा चटका आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



