Crime NewsLatest NewsMaharashtra

माना गावात अवैध वरली मटका खुलेआम; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

मूर्तिजापूर (प्रतिनिधी): मूर्तिजापूर तालुक्यातील माना गावात अवैध वरली मटका व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायत कार्यालयालगतच्या बाजारपेठेतच हा प्रकार सुरू असल्याने पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मूर्तिजापूर तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या माना गावात ग्रामपंचायतीने विक्रेत्यांसाठी बांधून दिलेल्या ओट्यांवरच मटका चालकांनी आपली दुकाने थाटल्याचे दिसून येत आहे. दिवसभर येथे खुलेआम आकडे लावले जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

या मटका व्यवसायामागे दोन व्यक्ती सूत्रधार असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. यामध्ये एक स्थानिक व्यक्ती तर दुसरा दर्यापूर तालुक्यातील तथाकथित ‘मटका किंग’ देशमुख असल्याची चर्चा आहे.

सध्या शाळा आणि महाविद्यालयांच्या परीक्षा सुरू असताना गावातील युवक मटक्याकडे आकर्षित होत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही नागरिकांनी या प्रकाराला विरोध दर्शविला असला तरी संबंधितांवर त्याचा कोणताही परिणाम होत नसल्याचे सांगितले जात आहे.

विशेष म्हणजे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार सुरू असतानाही कारवाई होत नसल्याने संबंधित ठाणेदारांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे अवैध मटका पूर्णपणे बंद करण्यासाठी गावकरी आता ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्याच्या तयारीत आहेत.

माना गावातील अवैध वरली मटक्यामुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. पोलिस प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस कारवाई करणार का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button