नागपूरमध्ये उघड्या पाण्याच्या टाकीत पडून दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; घरमालक अटकेत

नागपूर | प्रतिनिधी
नागपूर शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड्या पाण्याच्या टाकीत पडून दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित घरमालकाला अटक केली आहे.
२४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी मिनीमाता नगर, कळमना परिसरात राहणारा दोन वर्षांचा कुश राजेंद्र पटेल हा बराच वेळ घरात दिसत नसल्याने कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. शोध घेत असताना घरासमोर राहणाऱ्या गुड्डू उर्फ इमामुद्दीन मोहम्मद अझरूद्दीन शहा यांच्या घरासमोरील जिन्याखाली, रोडलगत असलेल्या सिमेंटच्या उघड्या पाण्याच्या टाकीत हा चिमुकला बेशुद्ध अवस्थेत आढळून आला.
नातेवाईकांनी तात्काळ त्याला बाहेर काढून उपचारासाठी स्थानिक दवाखान्यात नेले. त्यानंतर वर्धमान नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून कुशला मृत घोषित केले.
या प्रकरणी फिर्यादी जितेंद्र पटेल यांच्या तक्रारीवरून, संबंधित व्यक्तीने पाण्याच्या टाकीवर कोणतीही सुरक्षाव्यवस्था न केल्यामुळे आणि निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. कळमना पोलीस ठाणे यांनी भारतीय न्याय संहिता कलम १०६(१) अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, निष्काळजीपणामुळे आणखी किती बळी जाणार? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
एका उघड्या टाकीने दोन वर्षांच्या चिमुकल्याचा जीव घेतला… ही केवळ दुर्घटना नसून निष्काळजीपणाची मोठी किंमत आहे. प्रशासन आणि नागरिकांनी अशा धोकादायक ठिकाणांबाबत तात्काळ उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.



