agriculturecitynewsLatest NewsMaharashtraNanded

पार्डी मक्ता येथे शेतातील आखाड्याला भीषण आग; 20 शेळ्या व कोंबड्या दगावल्या, लाखोचे नुकसान

नांदेड | प्रतिनिधी

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुका येथील पार्डी मक्ता गावात एका शेतकऱ्याच्या शेतातील आखाड्याला अचानक भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत तब्बल 20 शेळ्या आणि कुक्कुटपालनातील कोंबड्यांचा जळून मृत्यू झाला असून शेतीची महत्त्वाची अवजारे आणि साहित्यही आगीत भस्मसात झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी उमेश नवनाथराव पतंगे यांच्या शेतातील आखाड्याला अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण आखाड्याला कवेत घेतले. आगीची तीव्रता इतकी होती की काही क्षणांतच पशुधन आणि शेती साहित्य जळून खाक झाले.

घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीची तीव्रता वाढत गेल्याने प्रयत्न अपुरे पडले. अखेर अर्धापूर येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली, मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.

या आगीत 20 शेळ्या आणि कोंबड्यांचा मृत्यू झाला असून शेतीसाठी लागणारी अवजारे, खाद्यसाठा आणि इतर साहित्य जळून खाक झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेमुळे पतंगे कुटुंबावर आभाळ कोसळले असून त्यांचा संसार अक्षरशः उघड्यावर आला आहे. ग्रामस्थांकडून शासन आणि प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button