महाराष्ट्र हादरला! प्रसिद्ध उद्योजकाची १७ व्या मजल्यावरून उडी; ‘चावी विसरलो’ म्हणत पुन्हा वर गेले आणि…

सोलापूर: सोलापूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एकेकाळी सोलापूरच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या ‘मुलतानी बेकरी’चे मालक सुनील सदारंगानी (वय ६०) यांनी इमारतीच्या १७ व्या मजल्यावरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्येपूर्वी त्यांनी हात जोडून केलेली प्रार्थना आणि त्यानंतरचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं? (घटनेचा थरार)
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील सदारंगानी गुरुवारी दुपारी विजापूर रोडवरील ‘पनाश अपार्टमेंट’ येथे आले होते. ते लिफ्टने नव्हे तर पायऱ्यांच्या साह्याने थेट १७ व्या मजल्यावर पोहोचले. तिथे गेल्यावर ते भिंतीच्या कठड्यावर उभे राहून हात जोडून प्रार्थना करू लागले.
हे दृश्य काही स्थानिक नागरिक आणि सुरक्षारक्षकांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने वर धाव घेत सदारंगानी यांना समजावून खाली आणले. मात्र, मृत्यूने जणू त्यांना साद घातली होती. “माझ्या गाडीची चावी वरच राहिली आहे, ती घेऊन येतो,” असा बहाणा करत ते पुन्हा वर गेले. सुरक्षारक्षक काही समजण्याच्या आतच त्यांनी १७ व्या मजल्यावरून खाली झोकून दिले.
आर्थिक विवंचना आणि उपचार
सुनील सदारंगानी हे सोलापूरमधील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व होते. मात्र, प्रसिद्ध मुलतानी बेकरी बंद पडल्यानंतर ते कुटुंबासह पुण्यात (खराडी परिसर) स्थायिक झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार:
- ते गेल्या काही काळापासून मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करत होते.
- त्यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू होते.
- व्यवसायातील चढ-उतार आणि मानसिक तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
तपासाचे चक्र वेगाने
या घटनेनंतर विजापूर रोड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदारंगानी यांच्या गाडीच्या नंबर प्लेटवरून त्यांची ओळख पटवण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. आत्महत्येपूर्वीचा त्यांचा व्हिडीओ पोलीस तपासासाठी महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे.



