Crime NewsLatest NewsNagpur

एकतर्फी प्रेमाचा भीषण अंत : नागपूरच्या गोधनीत तरुणीची घरात घुसून निर्घृण हत्या, आरोपी अटकेत

नागपूरच्या गोधनी परिसरात एकतर्फी प्रेमातून तरुणीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकारामुळे संपूर्ण शहर हादरले आहे. शेजारी राहणाऱ्या युवकाने भरदिवसा तरुणीच्या घरात घुसून तिची गळा दाबून व भिंतीवर डोके आपटून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने आत्महत्येचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला, मात्र पोस्टमार्टम अहवालामुळे त्याचा डाव फसला.

प्राची हेमराज खापेकर (वय २३) असे मृत तरुणीचे नाव आहे. प्राची बी.ए.ची विद्यार्थिनी होती आणि शेअर ट्रेडिंगचे प्रशिक्षणही घेत होती. तिच्या शेजारी राहणाऱ्या शेखर अजाबराव ढोरे (वय ३८) याने एकतर्फी प्रेमातून ही हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. प्राचीने शेखरच्या प्रेमप्रस्तावाला स्पष्ट नकार दिला होता. हा नकार शेखरला सहन झाला नाही आणि त्यातूनच त्याने टोकाचे पाऊल उचलले.

घटनेच्या दिवशी प्राचीचे आई-वडील आणि भाऊ कामानिमित्त बाहेर गेले होते. घरात प्राची एकटी असल्याची संधी साधत आरोपी शेखर घरात घुसला. त्याने आधी प्राचीचा गळा दाबला, त्यानंतर तिचे डोके भिंतीवर जोरात आदळले. हत्या केल्यानंतर ओढणीच्या सहाय्याने गळफास दिल्यासारखा देखावा तयार करून आत्महत्येचा बनाव रचण्यात आला.

मात्र पोस्टमार्टम अहवालात डोक्याला गंभीर मार आणि शरीरावर संघर्षाच्या खुणा आढळून आल्याने संशय बळावला. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत शेखर ढोरे याला अटक केली असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या क्रूर घटनेनंतर नागपूर शहरात संतापाची लाट उसळली असून, एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या गुन्ह्यांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button