citynewsFarmersCrisisLatest NewsMaharashtraWashim

मान्सूनच्या विलंबाचा हळद उत्पादकांना फटका; वाशीममध्ये हळदीचे बेण सुकू लागले, शेतकरी चिंतेत

वाशीम | प्रतिनिधी

यंदा हळदीच्या लागवड क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली असून उत्पादनाबाबत शेतकऱ्यांच्या अपेक्षाही उंचावल्या होत्या. मात्र मान्सूनने दिलेल्या हुलकावणीमुळे आता हळद उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. वाशीम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हळदीची लागवड करण्यात आली असली तरी पावसाअभावी पिकावर संकटाचे ढग दाटले आहेत.

जूनच्या सुरुवातीलाच मान्सून दाखल होईल, या अपेक्षेने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात हळदीची लागवड केली होती. विशेषतः वाशीम तालुक्यातील आडोळी परिसरात 500 एकरांहून अधिक क्षेत्रावर हळदीची लागवड करण्यात आली आहे.

हळद हे नगदी आणि खर्चिक पीक म्हणून ओळखले जाते. बियाणे, मशागत, मजुरी, खते आणि इतर कृषी निविष्ठांवर मोठा खर्च करावा लागतो. यंदा चांगल्या उत्पादनाच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी हळद लागवडीला प्राधान्य दिले. मात्र अपेक्षित पाऊस न झाल्याने आणि मान्सूनचे आगमन लांबल्याने या पिकाला मोठा फटका बसत आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही किंवा पाण्याचा साठा मर्यादित आहे, अशा शेतांमधील हळदीचे बेण जमिनीतच सुकू लागले आहेत. काही ठिकाणी हळदीचे कंद काळे पडून कुजण्याच्या घटनाही समोर येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

एकीकडे वाढत्या उत्पादन खर्चाचा भार आणि दुसरीकडे पावसाची अनिश्चितता, अशा दुहेरी संकटात हळद उत्पादक शेतकरी सापडला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष आता आकाशाकडे लागले असून येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही तर लाखो रुपयांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हळदीसारख्या खर्चिक पिकात केलेली मोठी गुंतवणूक धोक्यात आल्याने अनेक शेतकरी हवालदिल झाले असून आता सर्व आशा मान्सूनच्या आगमनावरच टिकून आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button