नागपूर : कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

नागपूरच्या यशोधरानगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, कौटुंबिक वादातून एका पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या सौ. रामेश्वरी देवेंद्र मानेश्वर या आपल्या पती देवेंद्र मानेश्वर यांच्यासोबत मिस्त्री काम करून उदरनिर्वाह करत होत्या. मात्र, आरोपी पती देवेंद्र हा पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असल्याची माहिती समोर आली आहे. दारूच्या नशेत तो वारंवार पैशांच्या कारणावरून रामेश्वरी यांच्याशी भांडण करीत असे.
घटनेच्या दिवशीही पैशांच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. आरोपी पतीने रामेश्वरी यांना बेदम मारहाण केल्याने त्या जागीच बेशुद्ध पडल्या. गंभीर अवस्थेत त्यांना तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी मृत महिलेचा भाऊ रामकिशोर पाचे यांनी दिलेल्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अन्वये हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी पती देवेंद्र मानेश्वर याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
कौटुंबिक वादातून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



