AmravatiLatest NewsMaharashtra Politicspolitics

प्रभाग १४ मध्ये काँग्रेसचा जोरदार प्रचार, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अमरावती महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. सर्वच पक्षांचे उमेदवार प्रचारात व्यस्त असताना, प्रभाग क्रमांक १४ अर्थात जवाहर बुधवारा प्रभागात काँग्रेस पक्षाने आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

माजी महापौर विलास इंगोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या चारही उमेदवारांनी प्रभागातील विविध भागांत जोरदार प्रचार सुरू केला आहे. काँग्रेसकडून विलास इंगोले, डॉ. संजय शिरभाते, सौ. सुनीता मनोज भेले आणि सौ. ललिता सुरेश रतावा हे उमेदवार रिंगणात उतरले असून, ते मतदारांच्या थेट भेटीगाठी घेत आहेत.

शुक्रवार, २ जानेवारी रोजी सकाळी रंगारी गल्ली, जवाहर गेट आणि धनराज लेन परिसरात काँग्रेसच्या उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार केला. या वेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत उमेदवारांचे स्वागत केले. रंगारी गल्ली परिसरात नागरिकांनी आरती ओवाळून व पुष्पहार घालून काँग्रेस उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रचार फेरीत काँग्रेसचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रचारादरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधत स्थानिक प्रश्न, विकासकामे तसेच रोजगाराच्या मुद्द्यांवर चर्चा केली.

यावेळी प्रतिक्रिया देताना माजी महापौर विलास इंगोले यांनी सांगितले की, त्यांनी वर्षानुवर्षे प्रभागातील जनतेची सेवा केली असून कोरोना काळात नागरिकांसाठी केलेले काम आणि तरुणांसाठी रोजगार निर्मितीचे प्रयत्न जनतेच्या लक्षात आहेत. प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांनी कायमच आपल्यावर विश्वास दाखवला असून, पुढील काळातही तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रभाग क्रमांक १४ मध्ये काँग्रेसच्या प्रचाराला मिळणारा प्रतिसाद पाहता, या प्रभागात काँग्रेसची स्थिती भक्कम असल्याचे राजकीय जाणकारांकडून सांगितले जात आहे. मात्र, अंतिम निकालात मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button