citynewsLatest NewsMaharashtraMumbai

हाफकिन संस्था आणि ‘चक्र’मध्ये सामंजस्य करार

वैद्यकीय संशोधन, क्लिनिकल ट्रायल्स आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात संयुक्तपणे कार्य करण्याचा निर्णय

मुंबई | प्रतिनिधी

महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि आरोग्यसेवा क्षेत्राला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था आणि महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधे विभागांतर्गत कार्यरत सेंटर फॉर हेल्थ, अप्लाइड नॉलेज अँड रिसर्च ऑटोनॉमी (चक्र) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे जैववैद्यकीय संशोधन, क्लिनिकल ट्रायल्स आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील सहकार्याला चालना मिळणार आहे.

सन १८९९ मध्ये स्थापन झालेली हाफकिन संस्था ही देशातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित जैववैद्यकीय संशोधन संस्थांपैकी एक मानली जाते. संसर्गजन्य रोगांवरील संशोधन, प्रशिक्षण आणि चाचणी क्षेत्रात संस्थेने महत्त्वपूर्ण योगदान दिले असून राष्ट्रीय स्तरावर तिची स्वतंत्र ओळख आहे.

सामंजस्य करारानुसार प्राध्यापक विकास, क्लिनिकल ट्रायल्स, जैववैद्यकीय संशोधन, ट्रान्सलेशनल मेडिसिन, जीनोमिक्स, सार्वजनिक आरोग्य आणि क्षमता विकास या विविध क्षेत्रांमध्ये दोन्ही संस्था संयुक्तपणे कार्य करणार आहेत. यामुळे संशोधनाची गुणवत्ता वाढविण्यासोबतच नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या कराराअंतर्गत संयुक्त संशोधन प्रकल्प राबविणे, प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे, प्राध्यापकांची देवाण-घेवाण करणे तसेच संशोधनासाठी उपलब्ध पायाभूत सुविधा परस्पर वापरण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे. यामुळे संशोधक, वैद्यकीय विद्यार्थी आणि आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांना अत्याधुनिक ज्ञान आणि अनुभव मिळण्यास मदत होणार आहे.

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात उत्कृष्टतेला चालना देण्याच्या उद्देशाने करण्यात आलेला हा करार महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. यामुळे आरोग्यसेवेतील नवकल्पना, संशोधनाधारित उपचारपद्धती आणि आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.

सामंजस्य कराराच्या वेळी वैद्यकीय शिक्षण व औषधे विभागाचे सचिव धीरज कुमार, चक्रच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रंजना कुमार, मुख्य प्रशासकीय अधिकारी ब्रिगेडियर मुलगुंद, हाफकिन संस्थेच्या संचालक डॉ. सुवर्णा खरात, मुख्य प्रशासकीय अधिकारी अजित जगताप, सहाय्यक संचालक डॉ. उषा पद्मनाभन, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. वृषाली पाटील तसेच प्रशिक्षण विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

या करारामुळे महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण, संशोधन, क्लिनिकल ट्रायल्स आणि आरोग्यसेवा क्षेत्रात ज्ञानवृद्धी, नवसंशोधन आणि क्षमता विकासाला महत्त्वपूर्ण चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button