नववर्षाच्या पूर्वसंध्येला गिट्टीखदान पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी६५ हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत

नागपूर
नववर्षाच्या पूर्वसंध्येला नागपूर पोलिसांनी नागरिकांना मोठा दिलासा देणारी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत हरवलेले तब्बल ६५ मोबाईल फोन शोधून काढत पोलिसांनी ते त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहेत. या मोबाईल्सची एकूण किंमत सुमारे १२ लाख ३३ हजार ५०० रुपये इतकी आहे.
गिट्टीखदान पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांनी दाखल केलेल्या हरवलेल्या मोबाईल फोनच्या तक्रारींच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या मदतीने विशेष शोधमोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान विविध नामांकित कंपन्यांचे ६५ मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश आले.
हे मोबाईल फोन बालाघाट, नागपूर, रिवा, पश्चिम बंगालमधील मालदा, सावनेर, कामठी, गोंदिया, झारखंड आणि आदिलाबाद अशा विविध ठिकाणांहून शोधून काढण्यात आले. सदर मोबाईल बाजारपेठा, प्रवासादरम्यान तसेच गर्दीच्या ठिकाणी हरवले होते.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला सर्व मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आले. ही संपूर्ण कारवाई पोलीस उपआयुक्त नित्यानंद झा आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी गिट्टीखदान पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक करत त्यांचे मनापासून आभार मानले आहेत. ही कारवाई पोलिसांच्या तत्परतेचा आणि नागरिकांच्या विश्वासाचा उत्तम नमुना ठरत आहे.



