AmravatiLatest News

चिखलदऱ्यातील अंबादेवी संस्थानाला 3 एकर 8 आर जमीन मंजूर

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; पर्यटन महामंडळाची जमीन धार्मिक विकासासाठी देणार अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडील ३ एकर ८ आर जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

पर्यटन महामंडळाची जमीन वापराविना पडून होती

चिखलदरा येथील सुमारे साडे सात एकर जमीन सन १९७५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा उभारण्यासाठी देण्यात आली होती. मात्र, दीर्घकाळ ही जमीन वापराविना पडून होती.

दरम्यान, अमरावतीच्या श्री अंबादेवी संस्थानाकडे चिखलदरा येथील देवी पॉईंट आणि विराट देवी देवस्थान यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. या दोन्ही देवस्थानच्या विकासासाठी संस्थानाने शासनाकडे संबंधित जमिनीची मागणी केली होती.

शासनाकडून जमीन विनामूल्य हस्तांतरणाचा निर्णय

संस्थानाची मागणी लक्षात घेऊन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडील सुमारे ३ एकर ८ आर जमीन शासन जमा करून घेण्यात येणार असून, ती जमीन श्री अंबादेवी संस्थानास विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ही जमीन मंदिर संस्थानाला भोगवटादार वर्ग – २ म्हणून देण्यात येणार असून, जमीन केवळ धार्मिक प्रयोजनासाठीच वापरण्याची अट घालण्यात आली आहे.

देवस्थान विकासाला चालना

या निर्णयामुळे चिखलदरा येथील देवी पॉईंट व विराट देवी देवस्थान परिसराच्या विकासाला चालना मिळणार असून, भाविकांसाठी अधिक चांगल्या सुविधा निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button