Latest NewsMaharashtrapolitics

महाविकास आघाडीत मोठी फूट? ठाकरे बंधूंची युती जाहीर; महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण

संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीची अखेर अधिकृत घोषणा झाली आहे. मुंबईतील वरळी येथील हॉटेल ब्लू सीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंनी दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं. या घोषणेमुळे महाविकास आघाडी तुटल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

या युतीनंतर आता मुंबईसह ठाणे, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, नाशिक आणि पुणे महापालिका निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढणार असल्याचं जाहीर करण्यात आलं.

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा ठळकपणे मांडला.
ते म्हणाले,
“मराठी माणसांनी बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवली. ठाकरे घराण्याने मुंबईसाठी संघर्ष केला आहे. मराठी माणसाच्या उरावर जेव्हा उपरे नाचू लागले, तेव्हा बाळासाहेब ठाकरे मराठी माणसाच्या न्यायासाठी पुढे आले.”

मुंबईच्या भवितव्याबाबत स्पष्ट इशारा देताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवरही अप्रत्यक्ष निशाणा साधला.
“मुंबईच्या चिंधड्या उडवण्याचे मनसुबे दिल्लीतल्या दोघांचे आहेत. मुंबईला तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा राजकारणातून खातमा केला जाईल,” असं ते म्हणाले.

मराठी समाजाला उद्देशून त्यांनी ठाम संदेश दिला,
“आता जर चुकाल तर संपल… मराठीचा वसा टाकू नका. मराठी माणसाच्या वाट्याला कुणी आलाच, तर त्याला परत जाऊ देत नाही.”

दरम्यान, महाविकास आघाडीबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली.
“सगळे पक्ष बाहेर पडले असं म्हटलं जात असलं, तरी महाविकास आघाडी अबाधित आहे,” असा दावा त्यांनी केला.

या घडामोडींमुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button